मी मुंबईकर
मुंबई, भारतातलच नव्हे तर जगातले एक मोठे आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे शहर. ब्रिटिशांनी याचे महत्व ओळखले व त्यास एक आकार दिला. हळूहळू व्यापार वाढू लागला तसे शहरामध्ये वसाहती वाढू लागल्या. रोजगाराच्या संधी वाढल्याने महाराष्ट्राच्याच नव्हे तर इतर राज्यांमधूनही लोक मुंबईच्या दिशेने येऊ लागले. सर्व प्रांतातले, सर्व धर्माचे, जाती जमातींचे लोकांचे लोंढे मुंबईत आले. आपापल्या प्रांतांमधून काहीच रोजगाराची वा प्रगतीची संधी न मिळाल्याने कुशल अकुशल जनता या नगरीत येऊ लागली. हे नगर आपल्याला काही ना काही रोजगार देईल या आशेने हे नागरीक मुंबईत थडकू लागले. त्यांचा या आशेला फुलवण्यात हिंदी चित्रपटाचा खूप मोठा वाटा आहे. त्यातला नायक जसा मुंबईत येऊन कोणत्या ना कोणत्या मार्गाने मोठा माणूस बनतो तसे आपण ही काही बनू अशी वेडी आशा त्यांना वाटायला लागली. या नगराचे दरवाजे देखील अशा सर्व प्रकारच्या लोकांसाठी सदैव खुले होते. सतत धावणारे शहर म्हणून या नगराची ख्याती सगळीकडे पसरू लागली व त्याची परिणिती आणखी लोंढे वाढण्यात झाली. एका गावातून एक माणूस आला, त्याला कामधंदा मिळाला की तो आपल्या गावातून आणखी लोकांना बोलावून घेवू लागला. अशाने ठराविक प्रांतातील नागरिकांच्या वसाहती मुंबईत वसू लागल्या. शहराची लोकसंख्या सगळ्या मर्यादा तोडून वाढू लागली. झोपडपट्टया वाढू लागल्या आणि अतिशय गलिच्छ, अस्वच्छ अशा वस्त्यांमध्ये लोक राहू लागले आहेत. या सर्वांना मूलभूत सुविधा पुरवणे सरकारला सुद्धा शक्य होत नाही. या सर्व गर्दीत मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली, ती म्हणजे या नगरातील मुळ 'मुंबईकर' हरवू लागला.
खर तर मुंबईकर म्हणजे कोण? ज्याचा मुंबईत जन्म झाला तो की ज्याने आपल्या आयुष्याची बरीच वर्षे मुंबईत काढली व आता तो इथेच स्थिरावला. या मुंबईकराचे 'स्पिरिट' नेहमी चर्चेत राहिले आहे. हे स्पिरिटच त्याला कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीत या शहरात टिकण्याचे बळ देत असते. खर तर रोजच्या पोटापाण्यासाठी त्याला धावणे भागच असते. पण यालाच मुंबईचे स्पिरिट म्ह्णून नावाजले असते. शहरात झालेले बॉम्बस्फोट असो, वा पूर परिस्थिती असो, हे शहर चोवीस तासात परत पुर्वीप्रमाणे धावू लागले. शहरात अहोरात्र धावणा-या लोकलच्या चाकांप्रमाणे इथल्या लोकांच्या पायाला पण चाके आहेत. कोणत्याही परिस्थितीत इथला माणूस धावतच असतो.
खरा मुंबईकर हा तसा सोशिकच. सगळे त्रास सहन करत तो या शहरात आनंदाने जगायचा प्रयत्न करत असतो. जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा समाजात आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. मुळातच उत्सवप्रिय असल्याने शहरात सगळ्या प्रकारचे उत्सव साजरे करतो. रस्त्यात एखादा अपघात झाल तर पुढे होऊन त्या व्यक्तिला मदत करतो. दुस-याच्या सुखा दु:खात तो आपलेपणाने सहभागी होतो. प्रवासात जास्त वेळ उभा असलेल्या अनोळखी माणसाला बसायला जागा देतो. क्रिकेट मॅच मध्ये सुद्धा भारताच्या विरोधी टीमचा खेळ चांगला झाला तर त्या टीमचे सुद्धा कौतूक करतो. अशा मुंबईकराचा मुंबईला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.
पण गेल्या काही काळापासून मात्र चित्र बदलतय अस वाटतय. आताचे मुंबईकर (ते केवळ मुंबईत राहतात म्हणून त्यांना मुंबईकर म्हणतोय) काहीही घटना घडली तर प्रथम मोबाइल बाहेर काढून फोटो काढतात. विडिओ बनवतात आणि सर्वात आधी सोशल मिडियावर शेअर करतात. आपणच सर्वात प्रथम ही बातमी वा घटना समाजाला कळविली पाहिजे असा अट्टाहास करतात. अपघातात जखमी झालेली व्यक्ती व्हिवळत असते पण तीला कोणी मदत करायला पुढे येत नाही. कोणात्याही आपत्तीच्या ठिकाणी गर्दी होते पण त्यात स्वयंफुर्तीने मदत करणारे थोडे तर सेल्फी काढणारे जास्त असतात. अशा लोकांच्या गर्दीमुळे सरकारी यंत्रणांना सुद्धा मदत करताना अडचणी येतात आणि मुख्य म्हणजे लोकांना त्याची जाणीवही नसते. आताच्या या लोकांना मुंबई विषयी काही प्रेम नसते, या नगराला आपण काही देण लागतो आहोत अस त्यांना वाटत नाही. आपण केवळ इथे पैसा कमवायला आलो आहोत आणि तेच आपले मुख्य कर्तव्य आहे यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. आता तर क्रिकेट मॅच ला सुद्धा फक्त भारताच्या टीमचे कौतूक करतात.
अशाने मुंबईचे मात्र नुकसान होते आहे. या शहराला गरज आहे ती या शहराला आपले मानणा-या लोकांची. हे शहर स्वच्छ ठेवणे हे आपले सुद्धा कर्तव्य आहे हे मानणा-यांची. या मुंबईच्या विकासात आपला हातभार लागावा या साठी धडपड करणा-यांची. या मुंबईची सुरक्षा ही माझी पण जबाबदारी आहे हे मानणा-यांची. असे जर मुंबईकर या शहराला मिळाले तर या शहराचे भवितव्य नक्कीच उज्वल असेल या विषयी माझ्या मनात शंका नाही.
- उमेश सोम्स -
No comments:
Post a Comment