“महा"राष्ट्र "राज"कारण
2019 च्या निवडणुकींचे कवित्व आता संपले आहे. निकालाआधी भाजप-शिवसेना किती जागांनी बहुमत मिळवणार याविषयी आखाडे बांधले जात होते. कॉंग्रेस आघाडी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच जागा मिळवील याविषयी कोणालाही संदेह नव्ह्ता. वंचित आघाडी यावेळीही कॉंग्रेस आघाडीला त्रास देईल असाच सर्वांचा अंदाज होता. आणखी एक सर्वांच्या चर्चेचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. विधानसभेला उमेदवार उभे करायचे की नाही याविषयी संभ्रम असताना अचानक आपल्या उमेदवारांची घोषणा केली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये सत्ता न मागता प्रबळ विरोधी पक्ष बनविण्याचे लोकांना आवाहन केले होते. सत्तेसाठी आवश्यक तेवढे उमेदवार उभे न केल्याने विरोधी पक्ष म्हणून विजयी करण्याचे आवाहन त्यांना करावे लागले. यात फार काही नैतिक विचार न दिसता केवळ मजबूरी व बुध्दिचातुर्य दिसून येते. 2006 मध्ये नव्या पक्षाची स्थापना करताना राज ठाकरे यांच्या विषयी लोकांमध्ये एक वेगळेच वलय निर्माण झाले होते. इतर कुठल्याही प्रस्थापित पक्षामध्ये न जाता त्यांच्या स्वता:चा नवीन पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयाचे लोकांनी स्वागत केले होते. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत मनसे चे 13 उमेदवार निवडून आले होते. तसेच साधारण तेवढेच उमेदवार दुस-या क्रमांकावर होते. २०१२ च्या महापालिका निवडणूकीत 9 महानगरपालिकेत एकून 112 नगरसेवक निवडून आले. त्यात सर्वात प्रमूख म्हणजे नाशिक महानगरपालिकेत ४० नगरसेवक निवडून आले.
हळूहळू मनसेचा आलेख चढता राहील असे लोकांना वाटायला लागले. पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले. दुस-या रेषेपेक्षा आपली रेष मोठी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण मनसेची तेवढे प्रयत्न करण्याची तयारी होती की नाही याविषयी शंका आहे. इथे आपली रेषा मोठी करण्याऐवजी मनसेने शिवसेनेची रेषा छोटी करण्याची प्रयत्न केले. मुद्दामून सेनेविरुध्द उमेदवार उभे करून त्यांचे उमेदवार पाडण्याचे षडयंत्र रचले. आणि इथेच त्यांनी लोकांची सहानुभूती गमवायला सुरवात केली. पक्षामध्ये त्यांच्या निर्णयाविरूध्द असंतोष वाढायला लागला आणि पक्षाला गळती लागायला सुरवात झाली. त्यांचे काही प्रमूख साथीदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. आपले प्रमूख साथीदार, नगरसेवक आपल्याला सोडून इतर पक्षांमध्ये जाताना त्यांना नक्कीच यातना झाल्या असतील. टोलविरोधी आंदोलन मध्येच सोडणे, कधी भाजपा - नरेंद्र मोदींचे तोंडभरुन कौतूक करणे, कधी त्यांच्या विरुध्द आघाडी उघडणे यासारख्या धरसोडीच्या धोरणाने लोकांची निराशा व्हायला लागली व मनसेचा जनाधार तूटायला लागला.
आतातर महाराष्ट्राचा राजकीय आलेखच बदलला आहे. प्रमूख चारही पक्षांनी आपापल्या भूमिकेत परिस्थितीप्रमाणे बदल केला आहे. कधी काळचे मित्र आता परस्पर विरोधी भुमिकेत आहेत तर कधी काळचे विरोधक आता सहकारी पक्ष झाले आहेत. महाराष्ट्राचा राजकीय परिघ या चार पक्षांनी व्यापला आहे. आता या परिस्थितीत मनसेची भूमिका काय असेल, मुळात मनसेचे काही प्रयोजन असेल का असा प्रश्न पडला आहे. पुढच्या काळात मनसे भाजपा बरोबर जाईल का, का ती भाजपाविरोधी आघाडीत सेनेबरोबर सामिल होईल, का एकला चालो रे या तत्वाने मनसे आपली वाटचाल चालूच ठेवल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पुढे येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक या सर्वांची उत्तरे देईल
No comments:
Post a Comment