Friday, 20 December 2019


     नागरिकत्व  सुधारणा  कायदा" - एक उहापोह

गेले काही दिवस भारतामध्ये सर्वत्र एकाच विषयाची चर्चा चालू आहे. तसेच मोठमोठ्या युनिवर्सिटींमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तो विषय म्हणजे "नागरिकत्व  सुधारणा  कायदा".  हा कायदा म्हणजे नक्की काय आहे, ज्यामुळे देशात एवढी गडबड चालू आहे.  पण त्याआधी मुळ 1955 चा कायदा बघूया. नागरिकत्व  कायदा, 1955 हा भारतीय नागरिकत्वासंबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे, ज्यात भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अटींची माहिती देण्यात आली आहे. भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कुठल्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्षं राहणं आवश्यक असतं. यापूर्वीही या कायद्यात आतापर्यंत 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015 अशी  पाच वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. 

आता या कायद्यात काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यातली एक म्हणजे पूर्वीची 11 वर्षाची अट शिथिल करुन ती 5 वर्षावर आणण्यात आली आहे. दुसरी सुधारणा पाकिस्तान, बांगला देश व अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्य म्हणजे हिंदू, शीख, जैन, बौध्द, पारसी व ख्रिश्चन आपल्या देशातून पलायन करुन भारतात आले आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल.  यामध्ये बिलात कुठेही 'छळ' हा शब्दप्रयोग नसल्याने या स्थलांतरितांना आपला छ्ळ होत होता असे कुठेही सिध्द करावे लागणार नाहे.   याचा अर्थ जे वरील उल्लेखित अल्पसंख्य पाकिस्तान, बांगला देश व अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर  2014 पूर्वी भारतात येतील त्यांना बेकायदा स्थलांतरीत मानले जाणार नाही व त्यांना भारताचे नागरिकत्व मिळेल. श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, तिबेटी निर्वासित व पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.  ही बाब लक्षणीय आहे.  तसेच ही दुरुस्ती देशाच्या काही भागांना लागू असणार नाही. त्यामध्ये  घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्नफ्रंटियर रेग्युलेशन, १८७३ मध्ये अधिसूचित केलेले भाग  यांचा समावेश आहे.

पण या कायद्याला भारताच्या खुपशा भागातून विरोध होतो आहे. हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.  हा कायदा मुस्लीमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतं, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा आक्षेप विरोधक घेत आहेत. ईशान्य भारतातून या कायद्याला प्रचंड विरोध होत आहे.  ही राज्ये बांगला देशला लागून असल्याने या राज्यांत घुसखोरी झाली आहे व बांगला देश मधील हिंदू व मुस्लिम मोठ्या प्रमाणावर या राज्यांत स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे असाही आरोप होत आहे की सरकार या स्थलांतरितांना कायदेशीर रित्या नागरिकत्व देऊन आपली वोट बॅंक मजबूत करत आहे.  तसेच पुढेमागे देशातल्या मुस्लिमांवर भेदभाव वा  काही बंधने येऊ शकतात अशी भिती मुस्लिमांच्या मनात आहे.

हा कायदा भारतात बेकायदेशीर रित्या प्रवेश केलेल्या व अनधिकृतपणे रहात असलेल्या लोकांमध्ये 1) त्यांचा देश 2)त्यांचा धर्म 3) त्यांची भारतात प्रवेश करण्याची तारीख व 4) ते देशाच्या कोणत्या भागात वास्तव्य करीत आहेत या आधारावर भेदभाव करतो. पण हा भेदभाव कायदेशीर आहे का हा कळीचा प्रश्न आहे. बिलातील Statement of Objects and Reasons (SoR) प्रमाणे फाळणीपूर्व हिंदूस्तानातील लाखो लोक पाकिस्तान व बांगला देशात वास्तव्यास आहेत. त्यामुळे या बिलात अफगाणिस्तानचा समावेश का करण्यात आला आहे याविषयी काहीही कारणे देण्यात आली नाहीत. जर अल्पसंख्यकांची एवढी काळजी आहे तर श्रीलंकेत अत्याचार होत असलेल्या तामिळ लोकांना यात का स्थान देण्यात आले नाही हे ही स्पष्ट होत नाही. तसेच पाकिस्तानात अल्पसंख्य असलेल्या व ज्यांचा धार्मिक छळ होतो अशा  अहमदिया (ज्यांना तिकडे मुस्लिम समजले जात नाही) त्यांना ही या विलातून का वगळण्यात आले याविषयी काही कारणमिमांसा नाही. 

याबिलामुळे बांगला देश नाराज झाला आहे. बांगला देशात अल्पसंख्यकांचा छळ होतो आहे असे या विलामुळे प्रतित होते.  सर्वच घुसखोर, हिंदू वा मुस्लिम,  काही धार्मिक छळामुळे भारतात आले नाहीत, काही जण पोटासाठी, रोजगारामुळे भारतात आले आहेत. या कायद्यामुळे विगर मुस्लिमांना मात्र भारतीय नागरिकत्व मिळणार आहे.

सरकार आपल्या परीने सर्वांना समजवायचा प्रयत्न करत आहे की या कायद्याने भारतातल्या कायदेशीर नागरिकांना, मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्याला काहीही त्रास होणार नाही. तसेच मुस्लिम देशातील जे अल्पसंख्य धार्मिक छळामुळे पलायन करुन भारतात आले आहेत त्यांना कायदेशीर रित्या नागरिकत्व देता येइल असा दावा सरकार करत आहे.  फाळणीपूर्व अखंड भारतातील नागरिकांच्या हक्काचे रक्षण करणे हा नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुख्य उद्देश आहे असे सरकारचे म्हणणे आहे.  पण हा कायदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "अखंड हिंदू राष्ट्र" बनविण्याच्या स्वप्नाचे पुढचे पाऊल आहे असेही काही विरोधकांचे मत आहे.

आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर जाणार आहे. सर्वोच्च न्यायालय आता राज्यघटनेच्या समानतेच्या तरतूदींचा सन्मान कायम ठेवते की संसदेने मान्यता दिलेल्या नव्या सुधारणा कायद्याला मान्यता देते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.  कारण या निर्णयावरच भारताची पुढील वाटचाल कशी होणार आहे हे ठरणार आहे.

उमेश सोम्स 

Thursday, 12 December 2019

मी मुंबईकर


मी मुंबईकर

मुंबई, भारतातलच नव्हे तर जगातले एक मोठे आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे शहर.  ब्रिटिशांनी याचे महत्व ओळखले व त्यास एक आकार दिला. हळूहळू व्यापार वाढू लागला तसे शहरामध्ये वसाहती वाढू लागल्या.  रोजगाराच्या संधी वाढल्याने महाराष्ट्राच्याच नव्हे तर इतर राज्यांमधूनही लोक मुंबईच्या दिशेने येऊ लागले. सर्व प्रांतातले, सर्व धर्माचे, जाती जमातींचे लोकांचे लोंढे मुंबईत आले.  आपापल्या प्रांतांमधून काहीच रोजगाराची  वा प्रगतीची संधी न मिळाल्याने कुशल अकुशल जनता या नगरीत येऊ लागली. हे नगर आपल्याला काही ना काही रोजगार देईल या आशेने हे नागरीक मुंबईत थडकू लागले. त्यांचा या आशेला फुलवण्यात हिंदी चित्रपटाचा खूप मोठा वाटा आहे. त्यातला नायक जसा मुंबईत येऊन कोणत्या ना कोणत्या मार्गाने मोठा माणूस बनतो तसे आपण ही काही बनू अशी वेडी आशा त्यांना वाटायला लागली.  या नगराचे दरवाजे देखील अशा सर्व प्रकारच्या लोकांसाठी सदैव खुले होते. सतत धावणारे शहर म्हणून या नगराची ख्याती सगळीकडे पसरू लागली व त्याची परिणिती आणखी लोंढे वाढण्यात झाली.  एका गावातून एक माणूस आला, त्याला कामधंदा मिळाला की तो आपल्या गावातून आणखी लोकांना बोलावून घेवू लागला. अशाने ठराविक प्रांतातील नागरिकांच्या वसाहती मुंबईत वसू लागल्या.  शहराची लोकसंख्या सगळ्या मर्यादा तोडून वाढू लागली. झोपडपट्टया वाढू लागल्या आणि अतिशय गलिच्छ, अस्वच्छ अशा वस्त्यांमध्ये लोक राहू लागले आहेत.  या सर्वांना मूलभूत सुविधा पुरवणे सरकारला सुद्धा शक्य होत नाही.   या सर्व गर्दीत मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागली, ती म्हणजे या नगरातील मुळ  'मुंबईकर' हरवू लागला.

खर तर मुंबईकर म्हणजे कोण?  ज्याचा मुंबईत जन्म झाला तो की ज्याने आपल्या आयुष्याची बरीच वर्षे मुंबईत काढली व आता तो इथेच स्थिरावला. या मुंबईकराचे 'स्पिरिट' नेहमी चर्चेत राहिले आहे. हे स्पिरिटच त्याला कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीत या शहरात टिकण्याचे बळ देत असते. खर तर रोजच्या पोटापाण्यासाठी त्याला धावणे भागच असते. पण यालाच मुंबईचे स्पिरिट म्ह्णून नावाजले असते. शहरात झालेले बॉम्बस्फोट असो, वा पूर परिस्थिती असो, हे शहर चोवीस तासात परत पुर्वीप्रमाणे धावू लागले.  शहरात अहोरात्र धावणा-या लोकलच्या चाकांप्रमाणे इथल्या लोकांच्या पायाला पण चाके आहेत.  कोणत्याही परिस्थितीत इथला माणूस धावतच असतो.

खरा मुंबईकर हा तसा सोशिकच. सगळे त्रास सहन करत तो या शहरात आनंदाने जगायचा प्रयत्न करत असतो.  जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा समाजात आनंद मिळवायचा प्रयत्न करतो.  मुळातच उत्सवप्रिय असल्याने शहरात सगळ्या प्रकारचे उत्सव साजरे करतो.  रस्त्यात एखादा अपघात झाल  तर पुढे होऊन त्या व्यक्तिला मदत करतो. दुस-याच्या सुखा दु:खात तो आपलेपणाने सहभागी होतो.  प्रवासात जास्त वेळ उभा असलेल्या अनोळखी माणसाला बसायला जागा देतो. क्रिकेट मॅच मध्ये सुद्धा भारताच्या विरोधी टीमचा खेळ चांगला झाला तर त्या टीमचे सुद्धा कौतूक करतो.  अशा मुंबईकराचा मुंबईला नेहमीच अभिमान वाटत आला आहे.

पण गेल्या काही काळापासून मात्र चित्र  बदलतय अस वाटतय.  आताचे मुंबईकर (ते केवळ मुंबईत राहतात म्हणून त्यांना मुंबईकर म्हणतोय)  काहीही घटना घडली तर प्रथम मोबाइल बाहेर काढून फोटो काढतात. विडिओ बनवतात आणि सर्वात आधी सोशल मिडियावर शेअर करतात.  आपणच सर्वात प्रथम ही बातमी वा घटना समाजाला कळविली पाहिजे असा अट्टाहास करतात.  अपघातात जखमी झालेली व्यक्ती व्हिवळत असते पण तीला कोणी मदत करायला पुढे येत नाही.  कोणात्याही आपत्तीच्या ठिकाणी गर्दी होते पण त्यात स्वयंफुर्तीने मदत करणारे थोडे तर सेल्फी काढणारे जास्त असतात.  अशा लोकांच्या गर्दीमुळे सरकारी यंत्रणांना सुद्धा मदत करताना अडचणी येतात आणि मुख्य म्हणजे लोकांना त्याची जाणीवही नसते.  आताच्या या लोकांना मुंबई विषयी काही प्रेम नसते, या नगराला आपण काही देण लागतो आहोत अस त्यांना वाटत नाही.  आपण केवळ इथे पैसा कमवायला आलो आहोत आणि तेच आपले मुख्य कर्तव्य आहे यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. आता तर क्रिकेट मॅच ला सुद्धा फक्त भारताच्या टीमचे कौतूक करतात.

अशाने मुंबईचे मात्र नुकसान होते आहे. या शहराला गरज आहे ती या शहराला आपले मानणा-या लोकांची.  हे शहर स्वच्छ ठेवणे हे आपले सुद्धा कर्तव्य आहे हे मानणा-यांची. या मुंबईच्या विकासात आपला हातभार लागावा या साठी धडपड करणा-यांची.  या मुंबईची सुरक्षा ही माझी पण जबाबदारी आहे हे मानणा-यांची.  असे जर मुंबईकर या शहराला मिळाले तर या शहराचे भवितव्य नक्कीच उज्वल असेल या विषयी माझ्या मनात शंका नाही.

- उमेश सोम्स -





Tuesday, 3 December 2019

“महा"राष्ट्र "राज"कारण




“महा"राष्ट्र "राज"कारण

2019 च्या निवडणुकींचे कवित्व आता संपले आहे. निकालाआधी भाजप-शिवसेना किती जागांनी बहुमत  मिळवणार याविषयी आखाडे बांधले जात होते. कॉंग्रेस आघाडी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच जागा मिळवील याविषयी कोणालाही संदेह नव्ह्ता.  वंचित आघाडी यावेळीही कॉंग्रेस आघाडीला त्रास देईल असाच सर्वांचा अंदाज होता. आणखी एक सर्वांच्या चर्चेचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. विधानसभेला उमेदवार उभे करायचे की नाही याविषयी संभ्रम असताना अचानक आपल्या उमेदवारांची घोषणा केली.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये सत्ता न मागता प्रबळ विरोधी पक्ष बनविण्याचे लोकांना आवाहन केले होते. सत्तेसाठी आवश्यक तेवढे उमेदवार उभे न केल्याने विरोधी पक्ष म्हणून विजयी करण्याचे आवाहन त्यांना करावे लागले. यात फार काही नैतिक विचार न दिसता केवळ मजबूरी व बुध्दिचातुर्य दिसून येते.   2006 मध्ये नव्या पक्षाची स्थापना करताना राज ठाकरे यांच्या विषयी लोकांमध्ये एक वेगळेच वलय निर्माण झाले होते. इतर कुठल्याही प्रस्थापित पक्षामध्ये न जाता त्यांच्या स्वता:चा नवीन पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयाचे लोकांनी स्वागत केले होते. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत मनसे चे 13 उमेदवार निवडून आले होते. तसेच साधारण तेवढेच उमेदवार दुस-या क्रमांकावर होते. २०१२ च्या महापालिका निवडणूकीत 9 महानगरपालिकेत एकून 112 नगरसेवक निवडून आले. त्यात सर्वात प्रमूख म्हणजे नाशिक महानगरपालिकेत ४० नगरसेवक निवडून आले.

हळूहळू मनसेचा आलेख चढता राहील असे लोकांना वाटायला लागले. पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले. दुस-या रेषेपेक्षा आपली रेष मोठी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण मनसेची तेवढे प्रयत्न करण्याची तयारी होती की नाही याविषयी शंका आहे. इथे आपली रेषा मोठी करण्याऐवजी मनसेने शिवसेनेची रेषा छोटी करण्याची प्रयत्न केले.  मुद्दामून सेनेविरुध्द उमेदवार उभे करून त्यांचे उमेदवार पाडण्याचे षडयंत्र रचले.  आणि इथेच त्यांनी लोकांची सहानुभूती गमवायला सुरवात केली. पक्षामध्ये त्यांच्या निर्णयाविरूध्द असंतोष वाढायला लागला आणि पक्षाला गळती लागायला सुरवात झाली.  त्यांचे काही प्रमूख साथीदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. आपले प्रमूख साथीदार, नगरसेवक आपल्याला सोडून इतर पक्षांमध्ये जाताना त्यांना नक्कीच यातना झाल्या असतील. टोलविरोधी आंदोलन मध्येच सोडणे, कधी भाजपा - नरेंद्र मोदींचे तोंडभरुन कौतूक करणे, कधी त्यांच्या विरुध्द आघाडी उघडणे यासारख्या धरसोडीच्या धोरणाने लोकांची निराशा व्हायला लागली व मनसेचा जनाधार तूटायला लागला.



आतातर महाराष्ट्राचा राजकीय आलेखच बदलला आहे. प्रमूख चारही पक्षांनी आपापल्या भूमिकेत परिस्थितीप्रमाणे बदल केला आहे. कधी काळचे मित्र आता परस्पर विरोधी भुमिकेत आहेत तर कधी काळचे विरोधक आता सहकारी पक्ष झाले आहेत. महाराष्ट्राचा राजकीय परिघ या चार पक्षांनी व्यापला आहे. आता या परिस्थितीत मनसेची भूमिका काय असेल, मुळात मनसेचे काही प्रयोजन असेल का असा प्रश्न पडला आहे.  पुढच्या काळात मनसे भाजपा बरोबर जाईल का, का ती भाजपाविरोधी आघाडीत सेनेबरोबर सामिल होईल, का एकला चालो रे या तत्वाने मनसे आपली वाटचाल चालूच ठेवल हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पुढे येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक या सर्वांची उत्तरे देईल